नामाशिवाय जो जो विश्वास । ते ते अविश्वासाचे
कारण आहे खास ॥ नामाविण मानी सत्य । नाही त्याने जोडला भगवंत ॥ नामाविण मानी जग । त्याचा
होऊ देऊ नये विटाळ ॥ नामाची जेथे मस्ती । तेथे रामाची वस्ती ॥ याहून जे जे वाटले सुख
। ते तेच दु:खाला कारण ॥ देवळे सभामंडपे न येत कामा । ज्याने नाही ठेविले हृदयी रामा
॥ राम करून घ्या आपुलासा । तोडा तोडा जन्ममरणाचा फासा ॥ राम एक दाता । त्याचेवाचून
नाही कोणी देता ॥ नामाचे अनुसंधान । प्रपंचात सर्वांचे समाधान ॥ जे जे होईल ते ते समाधानाचेच
कारण । रामास व्हावे अर्पण ॥ मोह, ममता, देहाचा अभिमान । हा संसाराचा पसारा जाण। तेथे
ठेवू नये मन ॥ नाही देहाला कष्ट देऊ । अनुसंधान न द्यावे बिघडू । नामात आहे समाधान
। हा विश्वास ठेवावा पूर्ण ॥
मी मागतसे
एक दान । ते द्यावे तुम्ही सर्वांनी ॥ नामापरते नका मानू सुख । रामापायी करून घ्यावे
आपणास अर्पण ॥ याहून नको मज काही । एवढी भीक घालावी सर्वांनी ॥ व्यवहार, लौकिक, विषयाची
आवड । हेच परमार्थाला मुख्य येईल आड ॥ त्यांना सारावे बाजूस । एक भजावे भगवंतास ॥ नाही
सत्य मानू जगी काही । रामाचा आसरा घ्यावा हृदयी ॥ जोपर्यंत देहाचा संबंध । तोपर्यंत
लौकिकाची चाड ॥ देह जाईल उठाउठी । लौकिक कोठे राहील पाठी ? ॥ त्याची धरू नये चाड ।
नाही सोडू भगवंत जाण ॥ प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी । नाही अंतर देऊ जगजेठी। चार वेद
सहा शास्त्रे । सर्व केल्या स्मृति पारायण । तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर। तोवर
तेथे कोठे समाधान ? ॥ सर्व शास्त्रांचे सार । एक भजावा रघुवीर ॥ नामी ठेवावे लक्ष पूर्ण
। तेणे होईल समाधान ॥ नामाची धरावी कास । देहादिक प्रपंचात न व्हावे उदास । हे सर्व
साधे राखता अनुसंधान ॥ आता करण्याचे उरले काही । हे किंचितही न आणावे मनी ॥ मनाने व्हावे
रामार्पण । सर्व सत्कर्म-साधनांचा कळस जाण ॥ चित्त ठेवावे रामापाशी । ध्यास असावा त्याचा
अहर्निशी ॥ देहाने नाही करता आले । मन रामापायी गुंतवले । रामाने त्याचे कल्याण केले
॥ राम ठेवील त्यात समाधान । हेच खरे भक्तीचे लक्षण जाण ॥ गुरूकडून घेतलेेले नाम। पावन
करील जगास । हाच ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ॥ देहाची स्थिति। कायम न राहे
निश्चीत ॥ ते सांभाळणे आहे जरूर । न विसरता रघुवीर ॥ रामा, तुझ्याकरिता राहिलो । हा
भाव ठेवावा निश्चीती । शक्य तो स्मरावा रघुपति ॥