तुम्ही सर्व भाविकजन । ऐकावे माझे वचन ॥ माझे
भेटी सदा राहावे । मुखाने रामनाम घ्यावे ॥ जो नामात राहिला । तो अखंड माझ्या दर्शनात
बसला ॥ जेथे नामाचे स्मरण । ते माझे वसतिस्थान ॥ जेथे रामाचे नाव । तेथे माझा ठाव ।
हे आणून चित्ती । सुखे राहावे प्रपंचाप्रति ॥ नामात ठेवा मन । हेच माझे खरे दर्शन ॥
नेहमी रामाचा ध्यास । हाच माझा सहवास ॥ तुम्ही सुज्ञ माझे प्राण । नाम करा तेवढे जतन
॥ नामात ठेवावे प्रेम । तेथे माझी वसति जाण ॥ ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे
। त्याने नाम कधी न सोडावे वाचे ॥ एवढे देईल जो नामदान । त्याला अर्पण करून घेईन जाण
॥ जेथे नाम । तेथे माझे धाम ॥ नामापरते न मानी सुख । तेथेच माझे राहणे देख । तुम्ही
शक्य तितके राहावे नामात । हेच माझे सांगणे तुम्हांस ॥ शक्य तो नामस्मरण करावे । म्हणजे
मी तुमचेजवळ अखंड आहे असे समजावे ॥ जेथे परमात्म्याचे नाव । तेथे माझा आहे ठाव ॥ जेथे
नाम तेथेच मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥
नाही केले
वेदपठण । शास्त्राचे नाही झाले ज्ञान । श्रुतिस्मृति उपनिषदे यांची नाही ओळखण। असा
मी अज्ञान जाण ॥ तरी एक भजावे रघुनाथासी । अर्पण होऊन जावे त्यासी । ऐसे जाणून चित्ती
। खंड नाही समाधानवृत्ति ॥ मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार । न सोडावा आता
धीर ॥ ठेवावा एक विश्वास। मी आहे तुम्हाजवळ खास ॥ श्रीदासबोध नामस्मरण। याचे असावे
वाचन । मी त्यातच मानावे जाण । कृपा करील रघुनंदन ॥ मी तेथे आहे हे नक्की समजावे ।
राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे ॥ उपाधिरहित मी तुमचेजवळ सतत आहे ॥ मी नाही अशी
कल्पना करू नये । तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे ॥ मी नाही सोडून गेलो कोणाला दूर
। माझी वसति तुमच्या शेजारी जाण ॥ माझे येणे जाणे तुमचे हाती । तुम्हा सर्वांहून नाही
परती ॥ रामपरता मी । जैसा प्राणापरता देह जाण ॥ सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा
हव्यास॥ त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥ जे जे करणे आणिले मनी। रामकृपे
पावलो जनी॥ आता पाहा मला रामात । आनंद मानावा नामात ॥ सर्वांनी राखावे समाधान । जे
माझे प्राणाहून प्राण जाण ॥ माझे ऐकावे सर्वांनी । सदा राहावे समाधानी ॥