।।जय श्रीराम।।
माझं बालपण सातारला गोरा रामाच्या सानिध्यात गेले आणि त्याचवेळी घरी श्री स्वामी समर्थांची उपासना सुरू होती.माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना श्रीरामराया, श्री स्वामीसमर्थ व श्रीमहाराज यांच्या कृपाशीर्वादानेच घडत आहेत. १९९३ साली विक्रोळीला श्रीमहाराजांच्या श्रीराम जपमंडळाची सुरुवात झाली तेंव्हापासून २००८ साली बेळगावला जाईपर्यंत श्रीमहाराजांची माझ्याकडून सेवा घडली. त्याचवेळी १९९६ साली श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह मिळाला व नाम साधना सुरू झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये राजनदादांची (राजेंद्र देशमुख) बहीण जी कऱ्हाड जवळील नृसिंहपुरला असते व तिच्याकडे श्री स्वामी समर्थांच्या कर्दळीवनातील पादुका आलेल्या आहेत, त्या दर्शनाचा योग आला. त्याचवेळी तेथे दत्तसंप्रदायातील थोर साधक श्री दादामहाराजांचे दर्शन व आशीर्वाद मिळाले. त्यांनी श्री स्वामीसमर्थांचे दर्शन नक्की होईल पण नामोपासना कमी पडत आहे व ती वाढवावी असे सांगितले आणि खरोखरच त्यावेळी काही कारणाने माझं नामस्मरण कमी झालं होतं. पण मला श्री स्वामीसमर्थांचे दर्शन होणार हा अनपेक्षित आनंदाचा धक्काच होता. सर्वांच्या आशीर्वादाने पुढे नामस्मरण आणि त्यातील सातत्य खूप छान होऊ लागले. त्याच महिन्यात मंडळाच्या २५ व्या वर्षाच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या एका छोट्या सत्संगात पू. नितीनदादांची पहिली भेट झाली. पण वेळ कमी असल्याने दर्शन झाले, बोलणं काहीच झालं नाही.
दोन वर्षाच्या सातत्याने सुरू असलेल्या साधनेनंतर जेंव्हा समजले कि २५ डिसेंबर २०१९ रोजी पू.नितीनदादा, इंदिराताई, अंजली (सौ. देशमुख) व राजनदादा अलकाताईंकडे नृसिंहपुरला येणार आहेत, तेंव्हा त्या सत्संगाचा लाभ घ्यायचे ठरवले आणि श्री स्वामी समर्थांनी "ना कळे तरी सत्संग धरावा" अशा त्या दिवसाच्या बोध वाचनाने मला संमतीही दिली. मी व माझे मिस्टर कोणत्याही प्रकारचा त्रास जाता-येता न होता तीन बसेस बदलून बेळगावहून नृसिंहपुरला आलो.
श्रीदादामहाराजांची व पू. नितीनदादांच्या झालेल्या अवर्णनीय भेटीचे आम्ही साक्षीदार होतो. त्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय असा सोहळा बघावयास मिळणे शक्यच नाही. दादांनी आम्हा दोघांना 'इनिसिएशन' दिले. त्यावेळचा तो स्पर्श आणि सुगंध हा माझ्या आयुष्यातील पहिलाच अनुभव होता. व दादांच्या पायावर नतमस्तक होऊन नमस्कार केल्यावर माझे डोळे भरून आले व श्री स्वामीसमर्थांनी पू. नितीनदादांच्या रूपात दर्शन दिले.
त्यानंतर लवकरच परत पू. नितीनदादांच्या भेटीचा योग आला आणि त्यावेळी त्यांनी डोक्यावर आपला हात ठेवला तो इतका हलका होता कि वर्णनच करू शकणार नाही. त्यात खूप प्रेम जाणवत होतं व आश्वासक वाटत होतं. दिलेल्या कृपाशीर्वादाने नामसाधनाची दिशा बदलली. तेंव्हा पू. नितीनदादांनी मला माझ्या नामजपा बद्दल थोडे विचारले. आणि सहजपणे म्हणाले की 'जप झाल्यावरही जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा अर्धा अर्धा तास नामाला बसावे'. या एका वाक्यामागे त्यांच्या कृपाशीर्वादाने मुख्य म्हणजे माझ्या नामात आनंद आला. जपाच्या वेळेत खूपच भर पडली, नियमीतपणा सहजपणे आला. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांचा खूप मानसिक त्रास होतो. त्यावर पू.नितीनदादा म्हणाले, "महाराजांना सांगावे आपणच ती माणसे पाठवलेली आहेत. त्यामुळे ती काळजी मी आपणावर सोपवत आहे." आतापर्यंत काळजी चरणाशी ठेवली जायची पू. नितीनदादांनी सांगीतल्यावर आता ती सोपवली गेली. त्या वाक्यांची व्हॅल्यू माझ्यासाठी खूप मोलाची ठरली.
श्री. स्वामीसमर्थांना प्रार्थना केल्यावर मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं पू.नितीनदादांच्या कडून मिळायला सुरुवात झाली, व मार्गदर्शन मिळत असून मन शांत रहाते. आणि जाणवतं...
संत जरी दिसती निराळे। तरी ते स्वरूपी मिळाले।।
खरोखरच मी धन्य झाले.
पुन्हा पुन्हा मनापासून धन्यवाद
स्वामी दादा
सदैव तुमच्या कृपाचरणी नत
सौ.आशा
।।जय श्रीराम।।
25-06-2020 03:15 pm / POSTED BY : Asha Harchilkar / Where the Experience took place : २५.१२.२०१९ नृसिंहपूर, ०८.०१.२०२०बेळगाव