जय श्रीराम
नमस्कार.
नितीनदादाचे वास्तव्य अमेरिकेत असताना आम्ही भक्त मंडळी त्याला सत्संगासाठी त्याची उपलब्धता आम्हाला कळवण्याची विनंती करत असू व दादाही आम्हाला त्याप्रमाणे तारखा कळवत असे. दादानी कळवलेल्या तारखांप्रमाणे आम्ही त्याच्या गावी हॉटेल मधे जाऊन रहात असू. मी दिवसा हॉटेलमधुनच ऑफिसचे काम करत असे व संध्याकाळी सत्संगसाठी दादाच्या घरी जात असे.
प्रसंग १: असेच एकदा मी दादाला त्याची उपलब्धता कळवण्याची विंनती केली असता दादानी फक्त सत्संग सुरू होण्याची तारीख कळवली. सत्संग किती तारखेपर्यंत किंवा किती दिवस असतील हे कळवले नाही. आता दादाला विचारणार तरी कसे, म्हणून मी जितके दिवस सत्संग असतील तितके दिवस दादाच्या गावी जाऊन राहायचे असे ठरवले. त्याच दरम्यान माझा ऑफिसचा मॅनेजर माझ्या गावाला बिझनेस मिटींग्स साठी येणार असल्याचे कळले. त्या मॅनेजरला प्रत्येक वेळी मी त्याच्या सोबत मीटिंगमधे लागत असे पण मला काहीही झाले तरी सत्संग चुकवायचा नव्हता. म्हणून मी दादा (फोटो) समोर उभे राहून नमस्कार केला, तीनदा नाम घेतले व मॅनेजरला फोन करून मी सत्संगासाठी बाहेरगावी जात असल्याचे कळवले. काहीशा नाराजीच्या स्वरात मॅनेजरनी मला मी परत कधी येणार असे विचारले. मी म्हणालो "माहीत नाही" कारण दादाने नेमकं त्याच वेळी सत्संग कधी पर्यंत चालणार हे कळवले नव्हते. मॅनेजरला काय वाटले कुणास ठाऊक पण तो "ठीक आहे" असे म्हणाला व मी आनंदाने दादाच्या गावाला जाऊन सत्संग करू शकलो.
प्रसंग २: एकदा मी सत्संगासाठी दादाच्या घरी गेलो असताना दादानी अगदी सहज बोलता-बोलता माझ्या ऑफिस मधल्या वातावरणाबद्दल विचारले. मी पण अगदी नकळत, क्लायंट मॅनेजर थोडा त्रास देतो, सत्संगाला यायला थोडा प्रॉब्लेम करतो असे म्हणालो. विषय तिथेच संपला. पुढे काही दिवसांनंतर एका दुसऱ्या सत्संगाच्या वेळी मी दादाला न्यूजर्सीला जाऊन आल्याचे सांगितले. दादाने कारण विचारले तेव्हा मी म्हणालो की नवीन क्लायंट मॅनेजर आला आहे, त्याला भेटायला गेलो होतो. क्षणाचाही विलंब न करता दादा मला म्हणाला, "जुना मॅनेजर तुला सत्संगाला यायला प्रॉब्लेम करत होता ना म्हणून मीच त्याला बदलला". मी क्षणभर स्तब्धच झालो. झालेल्या प्रकाराचा थोडा विचार केल्याबद्दल मला लक्षात आले की क्लायंट मॅनेजमेंटला जुना मॅनेजर बदलायचे तसे काहीच लॉजिकल कारण नव्हते पण तरीही त्याला बदलण्यात आहे होते. नवीन मॅनेजर अगदी कामाशी काम ठेवणारा होता व त्याने कधीच माझ्या सत्संगाला जाण्यामधे आडकाठी आणली नाही.
भारतातील सत्संग: २०१७ मधे दादा भारतात आला व त्याच्या मागोमाग मी सुद्धा ३ आठवड्याची सुट्टी घेऊन सत्संगासाठी भारतात आलो. पुण्यातील एका सत्संगानंतर दादानी मला माझी परतीची तारीख विचारली व औरंगाबादला सत्संग होणार असल्याचे सांगितले आणि सत्संगाची तारीख सुद्धा सांगितली. सत्संगाची तारीख माझ्या परतीच्या तारखेनंतरची होती. म्हणजेच मला सत्संग अटेंड करता येणार नव्हता. दादाचा औरंगाबादला होणारा हा पहिलाच सत्संग होता. तो सत्संग अटेंड करण्याची माझी मनापासून ईच्छा होती पण तसे करण्यासाठी मला माझी सुट्टी अजून २ आठवड्याने वाढवावी लागणार होती. मी दादाला सुट्टी वाढवून घेण्याबद्दल विचारले व दादा हो म्हणाला. मग काय मला बुलेट-प्रूफ जॅकेटच मिळाले होते. मी माझ्या मॅनेजरला अमेरिकेत फोन केला व सुट्टी २ आठवड्याने वाढवत असल्याबद्दल सांगितले. ते ऐकून मॅनेजर चांगलाच नाराज झाला व मला बरेच काही ऐकवले. मी ते शांतपणे ऐकून घेतले व फोन ठेवण्याआधी, "ठीक आहे, मी सुट्टी वाढवून घेतो" असे म्हणून फोन ठेवला. त्यानंतर औरंगाबादचा सत्संग घडला व मी एकूण ५ आठवड्याच्या सुट्टी नंतर अमेरिकेला परत गेलो. परत ऑफिस जॉईन केल्यावर मॅनेजरचे माझ्यासोबतचे वागणे जणू काही काहीच घडले नाही असे होते.
वरील तिन्ही प्रसंगांमधून दादाने मला स्पष्टपणे दाखवले की माझी नोकरी फक्त त्याच्या मर्जीनी चालली आहे. मला परमार्थ मार्ग सुसह्य व्हावा यासाठी दादाने, मी न मागता सुद्धा, ऑफिसच्या वातावरणात आवश्यक ते बदल घडवून आणले व त्याची मला जाणीव करून दिली. १०-जूनच्या प्रवचनात श्रीमहाराज म्हणतात - "आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ।।", त्याचीच ही प्रचिती आहे.
सत्गुरुनाथ महाराज की जय!
नमस्कार.
जय श्रीराम
28-06-2020 03:51 am / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : अमेरिका व भारत