जय श्रीराम
२ जुलैला रात्री दादांशी बोलणे झाले त्यावरून आम्हाला समजले की ते अमेरिकेला जात आहेत. अर्थात ते यावर्षी गुरु पौर्णिमेला भारतात नसणार.
अल्पना (पत्नी) दादाला म्हणाली रविवारी गुरु पौर्णिमा आहे, तू कदाचित गोव्यात येशील असे वाटत होते. त्यावर दादा म्हणाले यावर्षी पौर्णिमेचा काय प्लान आहे? मग लगेचच म्हणाले, "मला प्रसादाला काय करणार ते ऐकायचे नाही." त्यावर अल्पना म्हणाली, "आम्ही त्या दिवशी नामस्मरणावर जास्त भर देणार आहोत." त्यावर दादा उत्तरले, "आपण असा विचार करावा की आज गुरु द्वादशी आहे, उद्या गुरु त्रयोदशी, परवा गुरु चतुर्दशी आणि रविवारी गुरु पौर्णिमा. मी काय सांगतो आहे ते तुला समजले असेलच." आम्हा सर्वांना हा विचार सुखद वाटला.
दादांशी बोलणं संपल्यावर मी लगेचच ठरवले की मी त्या क्षणापासून गुरुपौर्णिमेपर्यंत जास्तीत जास्त नामात राहण्याचा प्रयत्न करणार, कारण नाम घेणे दादांना फार आवडते.
असा नाम घेण्याचा विचार मी पूर्वीही केला होता आणि तो पुढे कार्यान्वित झाला / केला नाही. हा मागील अनुभव लक्षात ठेवून मी मग असे ठरवले की काही एक लक्ष ठरवून त्या अनुषंगाने प्रयत्न करुया. म्हणून एक ‘क्ष’ जपसंख्या ठरवली जी गुरु पौर्णिमेपर्यंत पूर्ण करायला हवी होती.
ठरवलेले टार्गेट माझ्यासाठी (माझा आधीचा अनुभव पाहता) तसे कठीणच होते. माझे नाम घेण्याच्या बाबतीतील प्रयत्न आधी कधी कसोशीने झाले नव्हते. पण ह्या वेळी टार्गेट ठरवले ते पण दोन तीन दिवसांसाठी, म्हणून चिकाटीने आणि जबरदस्तीने प्रयत्न करायचा असे मी स्वतःशीच ठरवले. घरातील इतर कोणाला काही त्याबाबत सांगितले नाही.
खूप आधी, कधीतरी दादा म्हणाले होते की प्रत्येक लहानात लहान गोष्ट करत असताना देखील नाम घ्यावे. अनायासे नाम घेतल्याचे पुण्य मिळते. आपण रोज उठल्यावर, दात घासताना, आंघोळीपूर्बी, काहीही खाण्यापिण्या अगोदर, जेवण करत असताना, घराबाहेर पडण्यापूर्वी, ऑफिसला काम सुरु करण्यापूर्वी अश्या लहान प्रसंगी देखील सहज नाम घेऊ शकतो.
पण ह्या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मला जमत नव्हत्या. जेवणाच्या टेबलावर बसल्यावर, जेवण सुरू करण्यापूर्वी नाम घेतल्यानंतर लगेचच (आधीच्या माझ्या वाईट सवयीने ) माझ्याकडून काहीतरी अवांतर विषय काढले जाऊन त्यावर उगाचच संभाषण /वाद होत मग नाम घेणे तर दूरच राही.
मी आधी जो प्रयत्न केला होता, तो वरवरचा होता. जुन्या सवई मोडायला अवघड. त्यातही नाम घेणे काही माझ्या आवडीची गोष्ट नव्हती. त्यामुळे आपण जसे दरवर्षी ५ जूनला, जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने, आयते मिळालेले रोप लावतो, एक दिवस त्याला पाणी घालतो आणि मग पुढे वर्षभर त्या झाडाला विसरतो, तसे माझे व्हायचे.
त्यामुळे अनेकदा सद्गुरूंनी समजावूनही मला नाम घेण्याची आठवण / बुद्धी होत नव्हती .
मी ठरवले की यावेळी जपसंख्येचे लक्ष कुठल्याही परिस्थितीत पुरे करायचे. त्यानुसार मन लागो किंवा न लागो, प्रयत्न मात्र पूर्ण करायचे. दादांच्या फोटोला नमस्कार करून जप सुरु केला.
दादांची कृपा अशी की मी कळवले नाही तरी घरून मला जपासाठी सर्व प्रकारचे सहकार्य मिळाले. मी सकाळी लवकर जपाला बसलो ते दुपारी जेवायला उठेपर्यंत नाम घेण्याचा प्रयत्न केला, कारण ठरवलेले लक्ष नाहीतर पूर्ण होणे जरा कठीणच होते.
दुपारी जेवणासाठी बसलो, पण यावेळी नामाचाच विचार मनात होता म्हणून अवांतर गप्पा झाल्या नाहीत. नाही म्हणायला अमेयने (मुलगा) काहीतरी विषय काढला होता पण अल्पनाने त्याला गप्प केले. नंतरही छोटी छोटी कामे करताना नाम घ्यायचे आठवले जे आधी मला सातत्याने जमले नव्हते. दादांच्या कृपेनें ठरवलेले लक्ष पूर्ण झाले आणि मनाला खूप बरे वाटले.
मग दादांच्या कृपेनेच एक विचार आला की आपल्याला नामासाठी ठराविक वेळ रोज दिलाच पाहिजे. नामाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान दिलेच पाहिजे. म्हणजे नित्यनियम हा पाहिजेच.
नित्यनियमाच्या जोडीला मग (जेव्हा कधी आपण प्रपंचात व्यस्त असू तेव्हा) दादा म्हणाले तसे छोट्या छोट्या गोष्टी करतानाही मग नाम घेण्याची बुद्धी होईल
दादा! माझ्याकडून ठरवलेली जप संख्या पुरी करून घेतल्याबद्दल
THANK YOU.
जय श्रीराम
05-07-2020 09:19 pm / POSTED BY : SHANKAR GAJANAN KULKARNI / Where the Experience took place : ५ जुलै,२०२०; नुवें, गोवा