जय श्रीराम
सद्गुरू दादांस साष्टांग नमस्कार !
दादांची आणि आमची भेट गेल्यावर्षी, २० जानेवारी, २०१९ नंतर झाली. त्या अगोदर काही दिवस सुबोधनां (माझा नवरा) प्रमोदने (त्याचा मित्र) दादांबद्दल सांगितले होते. पण २० जानेवारीला सियाचा (माझी मुलगी) वाढदिवस होता त्यामुळे दादांना त्याआधी भेटणे झाले नाही.
नंतर लगेचच आम्ही प्रमोदबरोबर नुवेला दादांकडे सत्संगाला गेलो. सियापण आमच्याबरोबर होती. पहिल्यांदाच दादांबरोबर आम्ही सगळ्यांनी चांट केला. खूप बरे वाटले. दादांची दिव्य तेजमूर्ती पाहून मन एकदम प्रसन्न झाले होते. दादांनी जेव्हा मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला तेव्हा साक्षात श्रीरामानीच आमच्या डोक्यावर हात ठेवल्यासारखे वाटलं. त्या दिवसापासून आम्ही रोज सत्संगाला जात होतो. पुढे, पुण्यातील एक सत्संगाचा लाभही दादांच्या कृपेने आम्हाला एकदाच मिळाला, तो मार्च महिन्यात. त्यानंतरही आम्ही मुंबईतही अधून मधून दादांच्या कृपेने सत्संगाचा लाभ घेतला. प्रत्येक वेळी सिया आमच्याबरोबर असायची. ती मला रोज म्हणायची, “जर दादा आम्हाला माझ्या वाढदिवसाच्या पूर्वी भेटले असते तर मला माझ्या वाढदिवसाला दादांचा आशीर्वाद मिळाला असता; माझ्या येत्या वाढदिवसाला मला दादांच्या दर्शनाला जायचे आहे.”
नंतर जेव्हा गोव्यात सत्संग व्हायचे तेव्हा तेव्हा दादांच्या कृपेने तिला सेवेचा लाभ मिळत असे आणि ती मिळेल ती सेवा आवडीने करीत असे. कधी सेवेच्या यादीत नाव आले नाही तर ती रुसून बसायची आणि म्हणायची, "तू अल्पनाताईंना सेवेसाठी माझे नाव का नाही दिलेस?"
पुढे डिसेंबर महिन्यात पुण्यात सत्संग व्हायचे. बहुतेकवेळा रोज असायचे पण त्यावेळी आम्हाला काही कारणामुळे जायला जमले नाही; तेव्हा सिया म्हणायची "एकदा तरी आपण सत्संगासाठी पुण्याला जावूया." डिसेंबर महिन्याअखेरीस सत्संग दोन दोन दिवस सोडून असायचा. तेव्हा सिया म्हणत असे कि दादा आता गोव्यात येणार; माझा पुढील महिन्यात वाढदिवस आहे ना !
शेवटी , जानेवारी महिन्याच्या पहिल्या वीकएन्डला आम्ही शनिवारी सत्संग असेल असे गृहीत धरून, ४ जानेवारीला सकाळी पुण्याचा रास्ता धरला. दुपारचे बारा वाजले तरी सत्संगाचा मेसेज काही आला नाही. त्यावेळी आम्ही कराडला पोहोचलो होतो. मग असा विचार केला कि दादांना बहुतेक आम्हाला गोंदवल्याला पाठवायचे असेल. मग आम्ही क्षणाचाही विलंब न लावता थेट गोंदवले गाठलं व तेथे पोहोचल्यावर दादांना मेसेज केला. दादा त्यावर म्हणाले, “हे तुम्ही फार सुंदर काम केले आणि गोंदवल्याला गेलात.“
११ जानेवारीला, सकाळी १०.०१ मिनिटांनी दादांचा मेसेज आला की “महाराजांच्या इच्छेने मी गोव्यात पोहोचलो आहे.” मेसेज वाचून सिया अतिशय खुश होती कारण तिचा वाढदिवस जवळ आला होता. ती म्हणाली, "मी सांगितले नव्हते! माझ्या वाढदिवसाला दादा गोव्यात येणार म्हणून."
शेवटी तिच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. यावेळी तिच्या वाढदिवसासाठी तिने काहीच प्लॅनींग केली नव्हती. ना फ्रेंड्स; ना फॅमिली-डिनर प्लॅन केले होते...तिला फक्त दादांचे दर्शन घ्यायचे होते. शाळेतून घरी आल्यावर तिने लगेचच चौकशी केली कि आज दादांकडे सत्संग आहे कि नाही. तेव्हा मी तिला सांगितले कि आज सत्संग नाही कारण त्या दिवशी नॉर्थ गोव्यात कोलवाळे येथे होणाऱ्या सत्संगाची पूर्व तयारी करण्यासाठी सुबोधनां कोलवाळेला जावे लागणार होते. ते ऐकून सिया तशीच्या तशी गाल फुगवून, हाताची घडी घालून सोफ्यावर बसून राहिली. युनिफॉर्म पण काढला नाही. कुणाचेही ऐकायला तयार नव्हती. मला आजच दादांचे दर्शन घ्यायचे आहे असे म्हणत राहिली, कितीही समजावले तरी ऐकेना. दुपारचे जेवणही तिने केले नाही. आम्ही परत तिला समजावले कि उद्या दादांकडे जावूया पण ती तशीच बसून होती.
साधारणपाने पावणे तीन वाजता मी सुबोधला सांगितले कि तुम्ही जेवून घ्या कारण त्यांना कोलवाळेला प्रमोदबरोबर जायचे होते. ते म्हणाले, "दादांना मेसेज कर कि सियाला आज आपल्या दर्शनाला यायचे आहे." मला काय करू तेच सुचत नव्हते. दादा बिझी असणार. त्यांना मेसेज टाकू कि नको! मनात संघर्ष चालू होता. 'दादांना पण जर कोलवाळेला जायचे असेल तर?' असे विचार मनात सुरु होते.
पण तेव्हढ्यातच दादांचाच फोन आला, "मी पंधरा मिनिटात तुमच्याकडे पोहोचतो." हे ऐकताच सिया एकदम खुश झाली. तिने फटाफट युनिफॉर्म चेंज केला; आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तिला दादांच्या दर्शनाचा ध्यास लागला होता. तिच्या मनातील तीव्र इच्छा आणि भाव बघून, दादांनी स्वतः येऊन तिला दर्शन आणि आशीर्वाद दिला.
मी लहानपणी ऐकले होते कि भगवंत लहान मुलांची प्रार्थना लवकर ऐकतात. पण त्यादिवशी प्रत्यक्षच अनुभव आला.
सद्गुरूंवर आपला विश्वास आणि दृढ श्रद्धा असली पाहिजे आणि त्यातून जर निरागस मन असेल व निःस्वार्थी पारमार्थिक ईच्छा असेल तर मग आपली ईच्छा ते स्वतः पूर्ण करतात. आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची ते आपल्या भावनेवर अवलंबुन असते.
जय श्रीराम
31-07-2020 12:39 pm / POSTED BY : Sneha Govekar / Where the Experience took place : Margao Goa