जय श्रीराम
नितीन पहिल्यांदा गोव्याला आला (२००७) तेव्हा इंदिरा (त्याची पत्नी) त्याच्याबरोबर गोव्याला राहू शकली नव्हती कारण विक्रमचं (त्याचा मुलगा) शाळेचं बारावीचं एक वर्ष अजून बाकी होतं. आम्ही दोघंही त्याच्याबरोबर रहात असू. तो जेव्हा अमेरिकेला जायचा तेव्हा पुण्याला येत असू आणि तो परत यायच्या आधी दोन तीन दिवस पुन्हा गोव्याला जात असू.
एकदा असाच तो अमेरिकेतून मुंबईत आला होता आणि १ एप्रिलला (२००८) गोव्यात येणार होता. आम्ही ३० मार्चला कारने पुण्याहून निघालो.आमच्या बरोबर अल्पना (भाची) आणि तिचा छोटा अमेय होता. आम्ही बेळगावला जेवण केले व गोव्याकडे निघालो. दोघीनी ठरवलं, छान जप करायचा. माझे डोळे बंद होते. अनमोड घाट सुरू झाल्याचं पाहिलं होतं आणि पुढे काहीच माहीत नाही. केव्हा झालं, काय झालं वगैरे काही आठवत नाही. मला फक्त जाणवलं मी अंतराळात अधांतरी तरंगत आहे. पाय कुठेही टेकलेले नाहीत. भोवताली फक्त काळोख आणि कुठूनतरी श्रीराम श्रीराम ऐकू येतय. आजूबाजूला कोण आहे, मी कुठं आहे कशाचही भान नव्हतं. रामनाम चालू आहे म्हणजे मी मरते आहे का असा विचार आला. त्याही स्थितीत मी प्रार्थना केली, 'देवा मला अजून फक्त दोन दिवस ठेव. परवा नितीन येतोय त्याला डोळे भरून भेटते मग मला ने.'
त्याक्षणी मला नंदा (माझा नवरा), अल्पना, अमेय कुणीच आठवलं नाही. स्थळकाळाचंही भान नव्हतं आणि अचानक मी खाली येत आहे असं वाटलं. मग गाडीत बसल्याचं जाणवलं. घशाला कोरड पडली होती. कसलही त्राण नव्हतं. मग अल्पना जवळ आहे हे जाणवलं. तिला बोट लावलं. ती एकदम ओरडलीच "माई आहे, माई आहे" तोपर्यंत ती आशा सोडून रडतच होती. डोक्याला झालेल्या जखमेतून भळभळा रक्त वहात होतं साडी भिजली होती. मी खुणेने पाणी मागितलं. तिने थेंबथेंब पाजलं. आपली ओढणी गुंडाळी करून मला जखमेवर घट्ट धरायला सांगितलं. तोपर्यंत आम्ही आपल्या गाडीत नाही आहोत, उलट दिशेने का जातो आहोत वगैरे सर्व तिने मला सांगितले. आता मी भानावर आले होते. जणू काय मध्ये काहीच घडल नव्हतं.
आम्हाला अपघात झाला होता आणि मी आणि ड्रायव्हर बसला होता ती बाजू अगदी चक्काचूर झाली होती. एक शिकावू ड्रायव्हर डंपर ट्रक चालवत होता आणि त्याने वाटेत एका टू व्हीलरवाल्याला ठोकले आणि पळ काढत होता. लोक मागे लागले म्हणून मागे बघत तो घाट चढत होता. आम्ही दुसऱ्या बाजूने येत असताना, मागे बघतच त्याने आम्हाला सरळ ठोकल होत. मागून येणाऱ्या गाडीतील व्यक्तीने ते पाहिले आणि तो थेट आमच्याकडेच आला. (नितीनचाच हात नाहीतर वाटेत पडलेल्याला सोडून हा कसा आला).
ते एका डेरीचे मालक होते. ते कोल्हापूरला जात होते. आम्हाला त्यांच्या गाडीतून ते लोंढ्याच्या दिशेने नेत होते, कारण घाट निर्मनुष्य होता कोणतीही मदत मिळणे शक्य नव्हतं. टाके तर लवकरात लवकर घालायचे होते. रक्त वाहतच होत. इतक्यात एका खेडेगावात डॉक्टरची पाटी दिसली. आम्ही उतरलो आणि आत गेलो तर डॉक्टर बिचारे एक फ्युनरल अटेंड करायला निघत होते. पण पटकन मागे आले अन म्हणाले "duty comes first". त्यांनी टाके घातले, बाकीचे नर्सला उरकायला सांगून बाहेर आले. नंदाने फी विचारली तर 'अश्या वेळी फी काय घ्यायची' म्हणत तसेच निघाले. ते डॉक्टर असणे आणि एका साध्याशा खेडेगावात आणि तेही रविवारी दुपारी! ही योजना नितीनशिवाय कुणाची असू शकेल?
मी उभी राहिले तर माझ्या अंगावरून काचांचा नुसता खच पडला. अल्पनाने मला साफ करत, माझी साडी नीट केली. मी त्या डेरीमालकाचे आभार मानले. म्हटलं देवानेच तुम्हाला पाठवलं. त्यांनी मला "आई, तुम्ही ठीक आहात; आम्ही आशाच सोडली होती." "पण देवाने परत आणलंना" म्हटलं. त्यांनी मग आम्हाला गोव्यासाठी टॅक्सी करून दिली. "आज कोल्हापूरला जायलाच हवे नाहीतर सोबत आलो असतो." असं म्हणाले.
आम्ही थेट हॉस्पिटल गाठले. सगळ्या चाचण्या, स्कॅन होवून डीसचार्ज मिळेपर्यंत रात्र झाली. आम्ही हॉटेलवरच राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलो. दुपारी मुंबईहून नितीनचा फोन आला. "काय ग, प्रवास कसा झाला? काय विशेष?" असं म्हणाला. म्हटलं, "तुला तर सगळं माहीतच आहे रे." तरीपण मी सांगायला लागले तसं तो म्हणाला, "काही बोलू नकोस; श्रीमहाराजांची कृपा आहे."
प्रत्यक्ष काळाच्या दाढेतून माझ्या सद्गुरूने मला ओढून आणलं होतं. त्याला काय अशक्य आहे!
त्या करुणानिधीशी आता एकच प्रार्थना. 'माझ्या सर्व गुणदोषांसकट मला आपली म्हणून हात पकडला आहेस तेव्हा तुला आवडेल असं साधन माझ्याकडून करवून घे.'
प्रेमपूर्वक प्रणाम
जय श्रीराम
17-10-2020 10:08 pm / POSTED BY : Prafulla Gaitonde / Where the Experience took place : अनमोड घाट, गोवा, ३० मार्च, २००८