जय श्रीराम
माझ्या यजमानांच्या पायाच्या बोटाला गँगरीन होऊन पायाचे एक बोट १४ मे १८ रोजी गमवावे लागले. पायाचे ड्रेसिंगही सुरू झाले परंतु साधारण एका महिन्याने तळपाय खूप दुखु लागला व तळपायात पस झालेला दिसला. ट्रीटमेंट करुनही पस वाढतच होता असे दिसले. आम्ही हतबल झालो. काय करावे सुचेना. मी श्री नितीनदादांना मॅसेज करून ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली.
मी व यजमानांनी विचारांती पुणे येथे उपचारार्थ जाण्याचा निर्णय घेतला आणि १९ जून रोजी तातडीने दोघेही पुण्याला आलो. पुण्यात डॉ. जोशी यांना पाय दाखवला. डॉ.नी जखम चिंताजनक आहे हे सांगून दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितले. याबाबतचीही माहिती मी श्री दादांना मॅसेज द्वारे कळवली.
२२ जून रोजी यांच्या तळपायाचे ऑपरेशन करावे लागले. पण पाय वाचला. श्री दादांचे लक्ष आहे हि प्रचिती आम्हाला आली. श्री दादांच्या सांगण्यानुसार रामनाम व मी रोज म्हणत असलेली रामरक्षा दवाखान्यातही सुरू होती पण ह्यांचा कशावरच आता विश्वास राहिलेला नव्हता. खूप हळवे झाले होते! तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर रामनामाचा जप करीत बसत त्यांना धीर द्यायची. रात्री-अपरात्री त्यांच्या दुखणाऱ्या पायावर हात ठेवून मी रामनाम घ्यायची आणि श्रीरामाचा आणि श्री. दादांचा धावा करायची.
पुन्हा श्री दादांना यांची तब्येत कळवण्यासाठी मॅसेज पाठवला. त्यांनी रामनाम घेण्याचे, त्यात वाढ करण्याचे आम्हाला सांगितले.
दुसरीकडे माझ्या सासूबाईंची तब्येत अतिशय खालावली. दोघांच्याही तब्येतीमुळे मी खुप अस्वस्थ असायचे. प्रसंगी श्री. दादांना मॅसेज करायची, फोन करायची. श्री. दादा सुद्धा आम्हाला खूप धीर देत असत. उपाय एकच, नाम घ्या!
आता एक नवीच समस्या उद्भवली, ऑपरेशनची जखम सुकत आली होती पण टाचेत इन्फेक्शन वाढत चालले होते. तेव्हा ऑपरेशन करून इन्फेक्शन काढले गेले पण वेळ आल्यास गुढघ्या पासून पाय कापावा लागेल असे डॉ. नी आम्हाला सांगितले.
हे कळल्यावर अखेर आता अमरावतीला परत जाऊया, जे होईल ते तिथेच या विचाराने आम्ही आमचे मन पक्के केले व परत अमरावतीला आलो. पण श्री दादांच्या आशीर्वादाची आम्हाला पुन्हा एकदा सुखद अनुभूती आली. अमरावतीच्या डॉ. गोविंद लाहोटी यांनी सांगीतले, फक्त एक दिवस आड ड्रेसिंग करू या, त्यांचा पाय ऑपरेशन न करताच बरा होईल असा आम्हाला दिलासा दिला. त्यामुळे यजमानांना सुद्धा धीर आला व ते ही रामनाम घेऊ लागले. आणि खरेच यांचे दुखणे, इन्फेक्शनहि कमी होत चालले होते पण तळपायाची त्वचा अजूनही पाहिजे तशी बरी दिसत नव्हती. म्हणून डॉक्टरांनी त्वचा तज्ञांच्या मदतीने शास्त्रक्रियाकरून नवीन त्वचा बसवण्याचा सल्ला दिला. आम्ही त्यादृष्टीने उपचार घेण्यास सुरूवात केली. मात्र भोग अजूनही संपले नव्हते, कारण पायातील इन्फेक्शन टाचेच्या हाडा पर्यंत वाढत असल्याचे एक्स-रे व कलर डॉपलर रिपोर्ट मध्ये त्वचा तज्ञांना दिसून आले व आम्ही परत डॉ. लाहोटींकडे गेलो. ऑपरेशन करून हाडाला सोल्युशन लावायचे आणि मग इन्फेक्शन कमी झाले की ते सोल्युशन पायात वितळून जाईल असे ठरले. आणि त्याप्रमाणे यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले गेले. पण १५ मिनिटाच्या आत त्यांना पुन्हा रूम मध्ये आणले गेले. आम्ही घाबरलो! पण डॉक्टरांनी जे सांगीतले ते ऐकून आश्चर्यचकित झालो. डॉ. म्हणाले, आत इन्फेक्शनच नाही आहे, त्यामुळे ऑपरेशनची गरजच नाही! डॉ. नी जखम उघडी केली आणि परमेश्वर कृपेचा अनुभव आला. जिथे इन्फेक्शन आहे असे डॉक्टरांना वाटत होते तिथे काहीच इन्फेक्शन नव्हते!!
इन्फेक्शन नाही असे कळल्यावर डॉ भरत शाह या त्वचा तज्ञांकडे शस्त्रक्रियेने त्वचा लावण्यासाठी गेलो. तिथे गेल्या वर डॉ. नी २-३ ड्रेसिंग नंतरच पायावर नवीन त्वचा येत असल्याचे सांगितले. ह्यामुळे आम्हा दोघांचीही रामनामावरील श्रद्धा अजूनच दृढ झाली.
रामनामाच्या कृपेने पाय तर बरा झालाच पण जवळ जवळ सर्व मिळून रु.१ लाखाचा खर्चही वाचला व आर्थिक दडपण कमी झाले.
श्री दादांना आम्ही हे सगळे सांगितले तेव्हा मंद, प्रसन्न स्मीत करीत ते म्हणाले, हा रामनामाचा महिमा आहे ! दोन्ही डॉक्टर हे श्रीरामानेच पाठविले होते असेही ते म्हणाले. आमच्यासाठी तर हा चमत्कारच होता. हे सर्व अनुभव संकटसमयी श्रीमहाराज आणि श्री नितीन दादा सदैव पाठीशी असल्याची आम्हा सर्वाना सतत खात्री देतात आणि श्रद्धा दृढ होते.
जय श्रीराम
04-11-2020 10:45 pm / POSTED BY : Harsha Sumant Joshi / Where the Experience took place : अमरावती