दादा म्हणतात की महाराज करवून घेतात, त्यांना काहीही अशक्य नाही; आपण मात्र नामात राहावे. ते जे करवून आणतात ते योग्यच असत, फक्त आपल्याला ते कळत नसत. मनाविरुद्ध घडलं की ते चुकीचं आहे असं वाटतं. आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी ज्या महाराजांनी घडवून आणलेल्या असतात त्या योग्यच असतात ह्याचा प्रत्यय देणारी घटना दोन दिवसांपूर्वीच घडली.
फार मार्मिक आहे. महाराजांच्या कृपेने दादांनीच हे लिहून घेतले. माझ्या कॉलेज च्या मुलांचे ऑनलाइन ट्रेनिंग सुरु होते. ४ दिवसांपूर्वीच नवीन सॉफ्टवेअर आमच्या कंपनीत खरेदी केले होते आणि मी ते ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ऑपरेट करत होतो. मला लॉग इन करून त्या त्या शिक्षकांना क्लास घेण्यासाठी प्रेझेंटर म्हणून हक्क द्यावे लागायचे, रेकॉर्डिंग बटन ऑन करून क्लास संपेपर्यंत थांबायचे आणि मग ते रेकॉर्डिंग ऑफ करायचे. मधेच चुकून लॉग ऑफ होईन, मीटिंग बंद पडेल, रेकॉर्डिंग बंद होईल याचे फार टेन्शन असायचे. ३-४ दिवसांपासून हा उपक्रम सुरु होता आणि मी हे करायला खरं तर कंटाळलो होतो. रोज चार - साडेचार तास हे चालायचे. ह्यावर उपाय निघाला पाहिजे असे मनात सारखे सुरु होते. एक दोन वेळा सहज महाराजांना ही विनंती पण करून झाली होती. २२ मे चा दिवस होता. दादा म्हणतात तसे महाराजांना अशक्य काही नाही, आम्हाला मात्र आमच्या बुद्धीवर अति (खोटा) विश्वास असतो आणि मी करू शकतो ही वावगी कल्पना / अहंकार असतो.
त्या दिवशी मी नेहमी प्रमाणे ११.५० ला क्लास सुरु करून दिला. सध्या कोरोना मुळे ठराविक वेळीच खाली उतरून बाहेरची कामे करावी लागत असल्याने एकदा क्लास सुरु झाला की मग १२.१५-१२.३० ला खाली उतरायचे ठरवले. मनात सारखी भीती होती - मी नसताना काही गडबड झाली तर? बघा कसे आपण कर्तेपणा आपल्याकडे घेत असतो आणि चिंतेत बुडून जातो. अनुसंधानात राहणे अजून जमत नव्हते त्यामुळे खोटा अहंकार घेऊन काम चालू होते. अचानक १२.१९ ला त्या शिक्षकांचा फोन आला की कोणीतरी अनओथोराइज्ड पर्सन त्या ऑनलाईन क्लास मध्ये लॉग इन झाला आणि त्याला काढून टाका. मी तसे केले आणि नॉर्मली आम्ही मिटिंग लॉक करत नसतो पण त्यावेळी केली. आणि काय आश्चर्य! मला त्या सॉफ्टवेअर मध्ये एक ऑप्शन दिसला, नव्हे नव्हे दादांनी दाखवला की प्रेझेंटर बरोबर त्या शिक्षकाला ऑर्गनायझर करता येत होते आणि दादांनी तसे माझ्या नकळत करवून पण घेतले. मनात म्हटलं एवढे दिवस मला कसा हा ऑप्शन नाही दिसला, तिथेच तर होता! दादा म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट ही वेल प्लॅन्ड असते, इथे योगायोग नसतो. मी त्या शिक्षकाला म्हटले पहा बरं आता तुमचा तुम्हाला सगळा कंट्रोल करता येईल. झालं. एवढं करून, पीसी तसाच ऑन ठेवून आणि सीपीयू गरम होऊ नये म्हणून शेजारी कुलर ऑन ठेवून मी खाली उतरलो. एक उसासा टाकला. पण अजून टेन्शन होतंच. मी परत येईपर्यंत काही झालं तर? घरात मिसेस होती. तिला ह्यातलं काही माहिती नव्हतं. पण ती शक्यतो माझ्या रूम मध्ये येत नसल्याने मी तसाच न सांगता निघून गेलो. जमेल तशी पटापट कामे उरकली, १-२ कामे टाळली आणि परत आलो. १.२० झाले होते. पटकन सगळ्या पिशव्या ठेवल्या आणि तसाच माझ्या रूमकडे गेलो. पाहतो तो काय माझा पीसी बंद! माझं डोकंच फिरलं. प्रचंड राग आला मिसेसचा, हे तिनेच बंद केलं असेल. म्हटले, मी काय मूर्ख होतो का पीसी ऑन ठेवून, कुलर ऑन ठेवून जायला? झाली गडबड आता. रेकॉर्डिंग बंद पडलं असणार, मिटिंग च काय झालंय काय माहित. सगळं माझ्या मनाविरुद्ध घडलं होतं. अजून विकार प्रपंचातच वापरले जातात त्याचं हे उदाहरण. दादा म्हणतात की विकार वाईट नाहीत पण ते परमार्थात वापरावेत, प्रपंचात नाही. आम्हाला कळतं पण वळत नाही. मी पटकन सॅनिटायझर हाताला लावले, पीसी ऑन केला, सॉफवेअर मध्ये लॉग इन केले. पाहतो तो काय सगळं व्यवस्थित सुरु होतं! ते शिक्षक क्लास घेत होते. रेकॉर्डिंग पण ऑन होते. पीसी बंद करून पण काही गडबड झाली नव्हती. एवढं झाल्यावर मग मला महाराज आठवले आणि मनातल्या मनात दादांना आणि महाराजांना नमस्कार केला.
स्वतःची लाज वाटली की अरे एवढे नाम घेतोस पण अनुसंधान कुठे? अजून कर्तेपणा आहेच का स्वतःकडे? कशाला राग दुसऱ्यावर काढलास? पण काय उपयोग बाण धनुष्यातून निघून गेला होता, कर्म घडून गेले होते. पण मन कसे असते ना-अहंकाराला अजिबात खाली पडू देत नाही. महाराजांनी करवून आणलं असेल तर ते योग्यच असेल हे मी साफ विसरलो होतो. रागाने माझ्यावर प्रभुत्व गाजवले होते. पुन्हा एकदा तो मी हरलो होतो, पण महाराजांनी मला जिंकून दिलं होतं. दादांच्या आशीर्वादाने कळलं की चूक नक्की कुठे होती आहे ते. जो प्रॉब्लेम सोडवायचा मी माझ्या बुद्धीने ४ दिवस प्रयत्न करत होतो तो महाराजांनी असा विनासायास सोडवला. मग डोक्यात प्रकाश पडला - जे घडते ते योग्य आणि भल्यासाठीच घडत असते. जर हे त्या दिवशी घडले नसते तर आज मी तसाच रोज विनाकारण चार - साडे चार तास अडकून पडलो असतो, चीड चीड करत. आता मी मिटिंग सुरु करून देतो. ऑर्गनिझरचे हक्क शिक्षकाला देतो आणि मी लॉग ऑफ होतो १ मिनटात.
ll जय श्री राम ll
25-05-2020 01:23 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : पुणे, २२ मे २०