०१/०६/२०२०
बरेच दिवस सोरायसिस सारख्या रोगाशी झुंजता झुंजता गलितगात्र झालेला, रंजीस आलेला एक तरूण त्याच्या भाग्याने दादांच्या संपर्कात आला. दादांनी त्याला रामनाम घ्यायला सांगितले. ते तो प्रयत्नपूर्वक घेऊ लागला. काही दिवसात त्याच्या प्रकृतीत फरक पडला. कायम आजारी असलेला तो उठून हिंडू फिरू लागला. इतकंच नाही तर कामाला जाऊ लागला. आधीच्या आजारपणामुळे खोळंबून राहीलेली कामे तो आटपू लागला. परंतु त्या नादात त्याचे रामनाम कमी होऊ लागले. त्याची प्रकृती पुन्हा बिघडली. तो दादांना येऊन भेटला तेंव्हा दादा त्याला म्हणाले, "अरे, रामनाम कमी पडतंय म्हणून असं होतय. आपलंही असंच होतं. आपल्यावर संकट येतं तेंव्हा आपल्याला महाराजांची आठवण होते. महाराज उपाय सांगून आपल्यावरची संकटं कमी करतात. संकटं कमी झाली कि आम्ही पुन्हा जोराने प्रपंचाला लागतो. महाराजांनी सांगितलेलं विसरतो. असं होऊ नये. आपल्यावरची संकटं कमी झाली, आपले कष्ट महाराजांनी कमी केले कि ती शक्ती, तो वेळ आपण रामनामा साठी दिला पाहिजे, म्हणजे आणखी साधन होऊन आपले कष्ट आणखी कमी होतील. आपली कामं आणखी कमी होतील. आपल्याला आणखी वेळ मिळू लागेल. अशी ती चेन रिऍक्शन व्हायला हवी."
दादांच्या सांगण्यावर विचार करताना ते सांगत असलेली आपली चूक स्पष्टच दिसत होती. ती अमान्य करायचा प्रश्नच नव्हता. परंतु असं का होत असेल असाही प्रश्न पडला. मनाला आरोपीच्या पिंज-यात उभं करून जाब विचारला. मन खरं खरं सांगू लागलं. मन म्हणालं, "खरंतर मला प्रपंचाचीच मनापासून आवड आहे. जन्मोजन्मीच्या संस्काराने मी दृष्यातच रमतो. नामात मी तसा रमत नाही. जेंव्हा तुम्ही डोक्यावरंच बसता तेंव्हा मी नाम घेतो. किंवा जेंव्हा मी संकटाने घाबरतो किंवा दुःखाने कळवळतो तेव्हा ती दुःख किंवा संकट दूर होण्यासाठी मी नाम घेतो." मला त्याचं प्रामाणिक बोलणं आवडलं. मग मी मनाला समजावलं, "अरे, जर तुला दुःख, संकट नकोशी असतील तर त्यावर उपाय म्हणून तू आधीपासूनच नाम घे ना. औषधं घेण्यापेक्षा रोगाला कारण होणाऱ्या गोष्टी आधीच टाळ ना. मग तुला संकटाचा सामना करावा लागणार नाही. तुझा प्रपंच महाराज तुझ्या कल्पनेपलीकडे सुखाचा करतील. तू फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाम घे आणि बघ त्याचा परिणाम." आता बघू माझ्या समजवण्याचा मनावर काय परिणाम होतो तो.
01-06-2020 06:26 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : श्रीकांत दादा, पुणे