जय श्रीराम दादा
तुमच्या लेकरांवर तुमचे किती बारीक लक्षं असते त्याबद्दल आलेल्या प्रचितीचा एक अनुभव तुमच्या आज्ञेत राहून लिहू ईच्छिते.
लाॅकडाऊनच्या काळात आम्ही जेव्हा काम असेल तेव्हा घरून करून देत आहोत. परंतु त्याबद्दल वर्कशिट असे काही लिहून ठेवले नव्हते. ४ जूनच्या आसपास मला आमच्या व्यवस्थापकीय संचालक यांचा फोन आला. ते म्हणाले की सगळ्यांना एक ईमेल टाकून मे महिन्याचा वर्क रिपोर्ट मागवून घ्या.
आता झाली ना गडबड. कारण रिपोर्ट दिला नसता तर पगार मिळणार नव्हता हे मला समजले होते.
मी मनात दादांचे स्मरण केले आणि त्यांच्या स्मरणात राहून सगळ्यांना ईमेल लिहिले आणि माझा वर्क रिपोर्ट मॅनेजमेंटला पाठवून दिला.
अजून पगार झाला नाही पण मी त्याची सगळी काळजी सद्गगुरू चरणी अर्पण केलेय. त्यांच्या इच्छेने जेव्हा मिळायची असेल तेव्हा नक्की मिळेल.
माझे एक ऑफिसचे काम लाॅकडाऊन मुळे जवळ जवळ तीन महिने अडकून पडले होते. म्हणून मी आमच्या व्यवस्थापकीय संचालकांना विचारले की जर ते सोमवारी ऑफिसला असतील तर ऑफिसला जाऊन त्यांची मान्यता घेतली की माझे काम पुढे करायला मी मोकळी होणार होते. ते 'हो' म्हणाले म्हणून मी ऑफिसला जायला तयार झाले. ८ जून ला माझ्याकडून सगळी घरातील कामे दादांनी सुयशची (माझा मुलगा) मदत घेऊन पूर्ण करून दिली. दादा, किती हा सांभाळ तुमच्या लेकरांचा.
ऍक्चुअली ऑफिसला जायची तयारी तर दर्शवली होती पण मनात एक धाकधूक होतीच कोरोनाची. कारण रिक्शाने जायचे तरी सकाळपासून त्यात किती पॅसेंजर बसले असतिल याचीसुद्धा भिती वाटत होती. आमच्या ओळखीचा एक रिक्शावाला आहे पण आयत्यावेळी विचारल्याने त्याला माझ्या बरोबर ऑफिसला यायला जमणार नव्हते. त्यावेळी थोडे टेन्शन आलेले. पण घरातून बाहेर पडताना एवढीच प्रार्थना केली की दादा तुम्ही माझ्या सोबत चला आणि निघाले घरातून.
सोसायटीच्या बाहेर पडले आणि बघितले तर एकही रिक्शावाला नव्हता. पण रस्ता ओलांडून समोर जात असताना एक रिक्शावाला येताना दिसला. मी त्याला अंधेरीला येणार का असे विचारले आणि तो एका फटक्यात हो म्हणाला. नाहीतर भरपूर ट्रॅफिकमुळे अंधेरीला जायला रिक्शावाले सहसा तयार होत नाहीत.
रिक्षावाल्याने हो म्हटल्यावर माझ्या मुखातून जय श्रीराम बोलले गेले. एवढ्या सहज रिक्षा मिळाल्याने रिक्षामध्ये बसताना मी सुखावले होते कारण माझ्या सोबत दादा होते. त्यामुळे मी एकदम ऊत्साहात ऑफिसला गेले.
घरातून निघताना नेहमी प्रमाणे पर्स मध्ये किती रुपये आहेत ते चेक केले तर नेमकी पाचशेची नोट. म्हणून घरातून सुट्टे पैसे घेऊन निघाले ते सुद्धा रू. ४० च्या नोटा आणि थोडी चिल्लर. तेवढे तर तेवढे असं म्हणून घरातून बाहेर पडले. कारण ट्रॅफिक नसला तर रिक्षाला पैसे कमी लागतात.
आम्ही ऑफिस जवळ पोहोचत असताना जवळ जवळ ७० ते ७२ रू झालेले. मी नेहमीच्या सवईप्रमाणे पर्समध्ये हात घातला आणि शोधून शोधून तेवढे काढले आणि थोडे हातात ठेवले कारण ऑफिस पर्यंत पोहोचे पर्यंत मिटर वाढलेला असतो. ऑफिसला पोहोचेपर्यंत ८२ रू झालेले. मला वाटलं की झालं आता पैसे कमी असतील तर रिक्शावाला बडबड करेल. त्यात मलाही त्याचे नुकसान केलेले आवडले नसते. दादांना स्मरून मी हातातले पैसे वरवर मोजून त्याला दिले आणि विचारले की बरोबर आहेत ना , तर दादांच्या कृपेने बरोबर तेवढेच होते! पुन्हा माझ्या सोबत असल्याची जाणीव करून दिलीत दादा तुम्ही.
खरंच एकदा का तुम्ही आपलं म्हंटले की तुमच्या भक्तांचा/ मुलांचा हात तुम्ही जराही सोडत नाहीत.
तुमचा सहवास कायम लाभावा यासाठी माझ्या मुखात सतत नाम रहावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना दादा.
जय श्रीराम
23-06-2020 12:00 am / POSTED BY : Vaishali Sandeep Sadhale / Where the Experience took place : ८ जून २०२०, गोरेगाव, मुंबई .